सोमठाणा गड
रेणुकादेवी मंदिराचे दर्शन आणि हिरवा शालू नसलेला सोमठाणा गड पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची मांदियाळी दिसून येत आहे. त्यातच गडाच्या पायथ्याशी असलेला दुधना अप्पर मध्यम तलाव निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
बदनापूर शहरापासून पश्चिमेकडे जाताना अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर सोमठाणा येथील गड आहे. या ठिकाणी तालुक्याचे आराध्य दैवत श्री. रेणुकादेवी आणि महादेवाचे पुरातन मंदिर आहे. या गडावर आश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवात मोठी यात्रा भरते. मात्र मागील तीन वर्षांपासून तालुक्यावर वरुणराजाने कृपा केल्याने यंदा देखील भिज पावसात या गडाने हिरवा शालू नेसून गडाचे सौंदर्य आणखी खुलवले आहे. सोमठाणा गडावरून सध्या पावसामुळे तरारलेली हिरवीगार शेतातील पिके आणि नुकताच पूर्णत्वास आलेला समृद्धी महामार्गाचे विहंगम दृश्य वेगळ्याच विश्वात घेऊन जात आहे.
अप्पर दुधना प्रकल्प आकर्षणाचे केंद्र
सोमठाणा गडाच्या पायथ्याशी असलेला अप्पर दुधना मध्यम प्रकल्प पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. हा प्रकल्प मागील दोन वर्षात झालेल्या दमदार पावसाने ओसंडून वाहिलेला आहे. सध्या प्रकल्पात जवळपास ३० टक्के जलसाठा असून आणखी एक – दोनदा धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानंतर हा प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होण्याची शक्यता आहे. या तलावातील पाण्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. अर्थात हा त प्रकल्प सोमठाणाच्या गडावरील हिरवाईने आणखी खुलून दिसतो.
जालन्याकडे जाताना बदनापूरच्या आधी सोमठाणा फाटा लागतो. तिथून जेमतेम पाच कि.मि. अंतरावर असलेले हे रम्य ठिकाण एका दिवसाच्या पर्यटनासाठी उत्तम आहे.