नायगाव अभयारण्य
भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसाठी प्रसिद्ध असलेले नायगाव अभयारण्य बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे.
नायगावच्या मयूर अभयारण्याचे वन हे दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानगळीच्या व काटेरी वनाच्या प्रकारात मोडते. प्रादेशिक वन विभागाने या क्षेत्रात अंदाजे १२०० हेक्टर क्षेत्रावर विविध झाडांची लागवड केली आहे. या अभयारण्यात मोराबरोबर तरस, लांडगा, कोल्हा, रानमांजर, काळवीट, ससे यांसारख्या वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे. येथे १०० हून अधिक प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आढळतात.
नायगाव अभयारण्याचे मुख्यालय बीड येथे असून बीडपासून या अभयारण्याचे क्षेत्र बीड-पाटोदा-अहमदनगर या मार्गावर २० कि.मी.च्या अंतरावर आहे.नायगाव येथे बांधकाम खात्याचे दोन विश्रामगृह आहेत. त्याचे आरक्षण कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीड यांच्या कार्यालयात होते. याशिवाय इतर निवास व्यवस्था येथे उपलब्ध नसली तरी बीड शहर जवळच असल्याने खासगी निवासव्यवस्था मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे.