चारठाणा धार्मिक स्थळ – ऐतिहासिक हेमाडपंती मंदिरे
महाराष्ट्राला संत-महंतांची मोठी परंपरा आहे. मराठवाडा ही भूमीसुद्धा धार्मिक, ऐतिहासिक होय. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या चारठाणा येथे अनेक पुरातन मंदिरे आहेत. हेमाडपंती बांधकाम असलेल्या या मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असते. आजच्या लेखात आपण चारठाणा येथील मंदिरांसह नेमिनाथ जैन मंदिर, निमगिरी संस्थान, येलदरी प्रकल्पाची माहिती करून घेऊ.
जिंतूर तालुक्यात चारठाणा हे धार्मिक स्थळ आहे. शिवमंदिर असलेले चारूक्षेत्र (चारठाणा) हे हेमाडपंती मंदिराने वसलेली मराठवाड्यातील ऐतिहासिक धार्मिक व भक्तीचा समृद्ध वारसा लाभलेले गाव आहे. चारूक्षेत्र नगरी (चारठाणा) येथे हेमाडपंती शिवमंदिर, गोकुळेश्वर, काशीविश्वेश्वर, श्री नृसिंहतीर्थ मंदिर, दगडी बांधकाम असलेली अष्टकोनी बारव, झुलता मनोरा ही महत्त्वाची स्थळे आहेत.
श्री नृसिंहतीर्थ शिवमंदिर : गावाच्या पश्चिमेस असलेल्या चारुशयना नदीच्या किनाऱ्यावर नृसिंहतीर्थ मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर नदीकाठी दगडी पायऱ्यांचा घाट बांधलेला होता. घाटाचे अवशेष आजही शिल्लक आहेत. घाटावरून वर चढत गेल्यावर समोर एक प्रशस्त आवार (परिसर) असलेले एक भव्य नृसिंहतीर्थ मंदिर आजही पूर्णावस्थेत आहे.
हेमाडपंती मंदिराची रचना : समोर सभामंडप, पुढे अंतराळ, नंतर गाभारा अशी मंदिराची रचना आहे. सभामंडप १६ खांबांवर असल्यामुळे त्यास सोळा खांबी नृसिंह मंदिर असेही म्हणतात. या मंदिराचे नाव जरी नृसिंहतीर्थ असले तरी गाभाऱ्यात शिवलिंगाची स्थापना आहे. या नृसिंह मंदिराच्या सभामंडपातील उत्तर बाजूस दगडी स्तंभावर शिलालेख कोरलेला आहे. मंदिरासमोरील नदीच्या पात्रात काही ठिकाणी खोल डोह झालेले असून त्यांच्यात झारेकऱ्यांना क्वचित प्रसंगी प्राचीन नाणी सापडतात.
गोकुळेश्वर मंदिर : बुरुजाच्या पूर्वेस मातीच्या उंच भिंती असलेला वाडा दिसतो. मात्र, हा वाडा नसून ते एक भव्य शिवमंदिर आहे. हे शिवमंदिर चारठाणकरांचे ग्रामदैवत आहे. इतर मंदिरांप्रमाणेच यातही सभामंडप, नंतर अंतराळ व शेवटी गाभारा आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून त्याच्या उत्तरेस व दक्षिणेसही द्वारे आहेत. पश्चिम महाव्दाराच्या दोन्ही बाजूस दगडी बैठका आहेत.
जोड मंदिर देवी व महादेव : रेणुका देवी मंदिर व श्री काशीविश्वेर मंदिर, उकंडेश्वर मंदिराच्या पूर्वेस थोड्याच अंतरावर जोड मंदिर आहे. पहिले देवीचे व दुसरे महादेवाचे आहे. सभामंडपाला स्वतंत्र खांब नाहीत. तो भिंतीमधील अर्धस्तंभावर आधारित असून त्याच्यावर घुमटाकार छत आहे. स्तंभावर आठ तुळ्या असून त्यावर एकापेक्षा एक कमी होत जाणारी कंकणाकृती शिल्पे आहेत. मंडपाच्या भिंतीत पाच देवकोष्ठे आहेत, ती आज मूर्तीविरहित आहेत. महादेवाचे मंदिर दोन गाभाऱ्याचे (द्विदल) असून आज दक्षिणेकडचा गाभारा मोकळा आहे. त्याला काटकोनात पश्चिमाभिमुख असलेल्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे, ते मूळचेच दिसते.
महादेव मंदिरासारख्या विन्यास असलेले जोड देऊळ त्याच्या पश्चिम आहे. ही दोन्ही द्विदल देवळे एका उघड्या दीर्घिकेने जोडली आहेत. देवीच्या देवळाचा सभामंडप महादेवाच्या देवळापेक्षा वेगळा आहे. महादेवाच्या देवळात रंगशिळेभोवती चार खांब असून त्यावर एकापेक्षा एक लहान होत जाणाऱ्या चार त्रिकोणी शिळाचे थर आहेत. देवीच्या सभामंडपाचे छत (वितान) यापेक्षा अगदीच वेगळे आहे. ते भिंतीतील अर्धस्तंभावर आधारित असून छत चौकोनी आकाराचे वर निमुळते होत जाणारे आहे. त्यात एकावर एक बसणाऱ्या सात तुळ्या असून त्यावर हत्तीच्या टाळूसारखे दिसणारे अलंकार कोरले आहे. ते ढोबळपणे गाईच्या खुरासारखे दिसत असल्याने गावकरी देवीलाच खुराई म्हणतात.
मंदिरात जास्त कोरीव काम केलेले नाही; परंतु हे मंदिर अतिशय सुंदर आहे. श्री काशीविश्वेश्वर आणि रेणुका देवीचे मंदिर जोडलेले आहेत. सिद्धीविनायक गणपतीची ही मूर्ती सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची मूर्ती असल्याचे येथील जानकार मंडळी सांगत. ही मूर्ती अकरा फूट उंचीची आहे. दगडी आसनावर मांडी घालून बसलेली सुंदर असून ही मूर्ती चिनी मातीची बनवलेली असून तेव्हापासून आजपर्यंत जसास तशी आहे. प्राचीन संस्कृती असलेले जुने कौलारू घरे येथे काही प्रमाणात पाहायला मिळतात. हेमाडपंती मंदिरे व्यतिरिक्तही येथे पर्यटकांना आकर्षित करणारे हे वाडे अजून जशास तसे पाहायला मिळतात. औरंगाबाद-नांदेड २२२ महामार्गावरील औरंगाबादहून १८४ किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूस हे खोल खड्ड्यात दिसणारे चारठाणा हे गाव असून जिंतूर (जि. परभणी) येथून अठरा किलोमीटर अंतरावर आहे. हिवाळा, पावसाळ्यामध्ये हिरवळ असते.
जिंतूर पासून २० किमी आणि परभणी पासून ६२ किमी अंतरावर चारठाणा वसलेले आहे. तर सेलु हे सर्वात जवळील रेल्वे स्थानक आहे. सेलु पासुन चारठाणा २० किमी अंतरावर वसलेले आहे. सेलु रेल्वे स्थानक नांंदेड-औरंगाबाद लोहमार्गावर आहे. तसेच नांदेड विमानतळापासून चारठाणा १३० किमी अंतरावर वसलेले आहे.
पत्ता : चारठाणा, ता. जिंतूर, जि. परभणी – 431509