श्री क्षेत्र आपेगाव – ज्ञानेश्वरांची जन्मभूमी
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)
संत ज्ञानेश्वर
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले.
आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. त्यांनी विचार केला की “आईवडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे.” शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुनः समाजात सम्मिलित केले.
भावार्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.
पैठण शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर शहागड मार्गावरती आपेगाव हे गाव आहे. एस. टी बस, खासगी वाहतूक सेवा उपलब्ध.
श्री क्षेत्र आपेगाव मंदिर, पैठण-शहागड रोड, पैठण
गोदावरी नदी