श्री येडेश्वरी देवी मंदिर
येडेश्वरी देवीच्या मूर्तीची स्थापना त्रैतायुगात झाल्याचे मानले जाते. – बालाघाट डोंगर रांगेत सुमारे अंदाजे ३५० ते ४०० फूट उंचीवर हे मंदिर आहे. – मंदिरावर जाण्यासाठी २०४ पायऱ्या आहेत. – त्यापैकी पहिल्या पन्नास पायऱ्या चढल्यानंतर समोरच एक उंच अशी दीपमाळ आहे. – मंदिराच्या चोहोबाजूंनी चिरेबंदी तट आहे. – प्रवेशासाठी उत्तर, दक्षिण व पश्चिम या दिशांनी कमानी आहेत. – मंदिराची उभारणी हेमाडपंथी स्थापत्य शैलीतून झाली आहे. – मंदिर बांधकामामध्ये १०१ दगडी खांब व दगडी शिळांचा वापर केला आहे. – मंदिरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर देवीच्या स्नानासाठी दत्त कल्लोळ आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले, तेव्हा त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला ‘वेडी आहेस’ असे म्हटले. तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितली जाते. देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पाडतो. एरवी बारा महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट होते, अशी पूर्वीपासून मान्यता आहे. त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते. या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या, आंबील आदींचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. नवरात्रातही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो. येरमाळा येथील लोक व इतर भाविक येडेश्वरीला जागृत दैवत मानतात.
येरमाळा हे औरंगाबाद- सोलापूर धुळे महामार्गावर आहे. बसस्थानकापर्यंत सार्वजनिक वाहतूक आहे. तेथून मंदिरापर्यंत खासगी वाहनाने जावे लागते. येडेश्वरी देवी मंदिर हे उस्मानाबादपासून २५ किलोमीटरवर आहे तर तुळजाभवानीदेवी मंदिरापासून ५५ किलोमीटरवर आहे. मंदिरापर्यंत बसेसची सोय नाही. खासगी वाहनाने यावे लागते. कळंब व बार्शी येथून येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर २५ कि.मी.अंतरावर आहे.
पत्ता : येडेश्वरी मंदिर येरमाळा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद
उस्मानाबादपासून 2५ किलोमीटर