तुळजा भवानी मंदिर
तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असा दावा केला जातो.
इतिहास
हे शहर बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तुळजाभवानी संबंधित सर्वांत जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील ‘काटी’ येथे इ.स. १३९७ सालच्या शिलालेखात पहावयास मिळतो.
वैशिष्ट्ये
श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात.
पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईया आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे.
श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते.
- तुळजा भवानी मंदिराची अधिकृत वेबसाइट: https://www.tuljabhavani.in/
- तुळजा भवानी मंदिराचा संपर्क क्रमांक : २४७१२४२०३१
- तुळजा भवानी मंदिराची वेळ : पहाटे ४.०० ते रात्री १०.००
- हैदराबाद ते तुळजापूर भवानी मंदिर अंतर : NH65 मार्गे 5 तास 48 मिनिटे (299.0 किमी)
- पुणे ते तुळजापूर भवानी मंदिर अंतर: 5 तास 12 मिनिटे (293.0 किमी) मुंबई Hwy/पुणे – सोलापूर Rd/सोलापूर – पुणे Hwy आणि NH65 मार्गे
- हैदराबाद ते तुळजा भवानी मंदिर महाराष्ट्र : NH65 मार्गे 5 तास 49 मिनिटे (299.0 किमी)
- तुळजापूर मंदिर पत्ता : श्री तुळजा भवानी मंदिर, महाद्वार रोड, जिजामाता नगर , तुळजापूर , महाराष्ट्र 413601
तुळजा भवानी मंदिरात कसे जायचे:
- हवाई मार्गे : सर्वात जवळचे विमानतळ उस्मानाबाद येथे आहे, जे तुळजा भवानी मंदिरापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे.
- रेल्वे मार्गे: तुळजा भवानी मंदिर जवळच्या रेल्वे स्टेशन पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे.
- बसमार्गे : तुळजापूर हे मुंबईपासून 400 किलोमीटर, पुण्यापासून 300 किलोमीटर आहे . मंदिरात जाण्यासाठी खाजगी वाहने आणि सरकारी बसेसचाही वापर करता येतो.